स्वत्वाच्या शोधात 'थिसियसचे जहाज'

स्वत्वाच्या शोधात 'थिसियसचे जहाज' 
-श्रीराम मोहिते


कुठलाही चांगला चित्रपट मनोरंजन तर करत असतोच पण त्यापलीकडे जाऊन जगण्याबद्दलची आपली समज वाढवतो; जगण्याकडे बघण्याची आपली एकरेषीय दृष्टी रुंदावण्यास मदत करतो.मुख्य प्रवाहातील कचकडी चित्रपट वास्तवाचे एक वरवरचे आणि बरेचसे पलायनवादी चित्रण करताना दिसतात त्याला छेद देऊन वास्तवाच्या अनेकस्तरीय गुंतागुंतीचे भान देणारे अनेक चित्रपट आज निर्माण होत आहेत. आपण भारतीय सिनेमा असं म्हणतो तेंव्हा प्रामुख्याने आपल्या नजरेसमोर जे लोकप्रिय सिनेमाचं चित्र उभं राहतं त्याहून वेगळ्या आशय विषयांचे दर्शन घडवणारे असे प्रयत्न अनेक अर्थाने महत्वाचे ठरतात.चित्रपट कलेच्या वाढीसाटी हे चित्र निश्चितच आश्वासक असते.हे सर्वार्थाने नवे चित्रपट मानवी जगण्याच्या अनेक छुप्या अंतर्विरोधांना आपल्यासमोर मांडतात,त्यातल्या अनेकविध पेचांना समजून घेण्याची आपली क्षमता वाढवतात.

              'शिप ऑफ थिसियस' हा आनंद गांधी दिग्दर्शित चित्रपट मानवी अस्तित्वविषयक काही मूलभूत प्रश्नांना स्पर्श करतो. थिसियसचे जहाज हे एक प्राचीन मिथक आहे. इ.स.पहिल्या शतकातील तत्वज्ञ प्लुटार्कने 'लाईफ ऑफ थिसियस' मधून 'शिप ऑफ थिसियस' ही तत्वज्ञानात्मक संकल्पना मांडली. ग्रीक पुराणकथेतील या संकल्पनेतून प्लुटार्कने विचारलेला स्वत्वाविषयीचा प्रश्न 'थिसियसचा पॅराडॉक्स ' म्हणून ओळखला जातो.या मिथकानुसार थिसियसच्या जहाजाबद्दल अशी गोष्ट सांगितली जाते की,अथेन्सचा राजा एजियस हा एका करारात बांधला गेला असतो.

या करारानुसार क्रिटच्या राजाकडे त्याने दरवर्षी सात-सात तरुण तरुणी मिनॉटॉरचे भक्ष्य म्हणून बळी द्यायला पाठवायचे ठरलेले असते.थिसियस हा प्रश्न कायमचा निकालात काढायचे ठरवतो. थिसियस हा राजा एजियस आणि एथराचा अत्यंत देखणा राजपुत्र असतो. काही लोकांना सोबत घेऊन थिसियस जहाजावरुन क्रिटकडे निघतो. निघताना एजियस थिसीयसला एक महत्वाची सूचना करतो.ती म्हणजे-  "तू सहीसलामत परतशील तेव्हा जहाजाची शिडे पांढरी ठेव, अन्यथा तू गेला आहेस असं मी समजेन." पुढे थिसियस मिनॉटॉरचा वध करून राजकन्येला घेऊन आपल्या जहाजावरून परत निघतो. मात्र इथे तो जहाजाची काळी शिडे काढून पांढरी लावायला विसरतो.ती काळी शिडे पाहून इकडे एजियस दुःखतिरेकाने कड्यावरून उडी मारून जीव देतो.

                 यातले उपकथानक चित्रपटाच्या संदर्भात महत्वाचे आहे. ते म्हणजे, जे जहाज तो घेऊन जातो ते एजियसने कलेच्या दैवताला म्हणजे अपोलोला स्मरून दिलेले आहे. ही भेट व्यवस्थित जपून ठेवण्यासाठी प्रवासात जहाजाचे पाण्यात सतत भिजणारे , झिजणारे लाकूड बदलावे लागत होते.आणि असे करता करता एक दिवस जहाजाचा प्रत्येक भाग बदलत गेलेला असतो .त्यामुळे त्यानंतर शेकडो वर्षात एक तत्वज्ञानात्मक मिथक तयार झाले.थिसियसच्या जहाजातील मूळ जहाज कोणते? ,बदलत गेलेल्या भागांच्यासह असणारे जुने की बदलत गेलेले सर्वस्वी नवे ? जहाजाचे एकेक करून सर्व भाग बदलत गेल्यावर जुन्या जहाजातील एकही जुना भाग शिल्लक राहिला नाही.मग त्या जहाजाला मूळचे 'थिसियसचे जहाज ' म्हणता येईल का?

              दुसऱ्या बाजूने ते सर्व जुने भाग एकत्र करून समजा एखादे नवीनच जहाज बनवले गेले तर मग 'थिसियसचे जहाज ' कोणत्या जहाजाला म्हणावे? मूळच्या की नव्या बनवलेल्या ?
                 'शिप ऑफ थिसियसमधून दिग्दर्शक आनंद गांधी यांनी या तत्वज्ञानात्मक विचारव्यूह मांडण्यासाठी तीन वेगवेगळ्या कथासूत्रांची गुंफण केली आहे.
                 पहिली कथा आलिया नावाच्या एका अंध ईजिप्शियन छायाचित्रकार मुलीची आहे.साधारण पंचवीस वर्षांची आलिया मुंबईत राहत असून अत्यंत कलात्मक अशी छायाचित्रे ती काढते आहे.अंध असल्यामुळे 'व्हॉइस रिकग्निशन ' तंत्र असणारा कॅमेरा,संगणकाच्या मदतीने भवताल टिपण्याची तिची स्वतंत्र अशी दृष्टी आहे किंबहुना अंध असणं हाच तिच्या अपूर्व अशा अभिव्यक्तीचा अविभाज्य भाग आहे.पुढे 'कार्टिना ट्रांसप्लँट'चे ऑपरेशन होऊन तिला आपली दृष्टी परत मिळते.आता पूर्वीपेक्षा एका नव्या विश्वाला तिला सामोरे जाताना तिच्या अभिव्यक्तीच्या पूर्वीच्या धारणांना धक्के बसू लागतात.अंध असताना ज्या प्रेरणा तिला लाभदायक ठरत होत्या त्याचा नजर परत आल्यामुळे अडसर ठरू लागतात.निवडीच्या अनिर्बंध स्वातंत्र्यात अडकून तिची सर्जनशीलता कशी गर्तेत सापडते याची ही कथा आहे.

                 ‎दुसरी कथा मैत्रेय नावाच्या जैन भिक्षुच्या काहीशा टोकाची वाटू शकेल अशा तात्विक झगड्याची पण विलक्षण तरल अशी गोष्ट आहे.मैत्रेय टोकाचा अहिंसावादी आहे.कोणत्याही प्रकारची हिंसा त्याला मान्य नाही.त्यासाठी अत्यंत कठोर अशी जीवनशैली त्याने स्वीकारलेली आहे.प्राण्यांवर अमानुषपणे होणाऱ्या औषधांच्या आणि सौन्दर्यप्रसाधनांच्या चाचण्यांविरुद्ध न्यायालयात 'जनहितयाचिका 'दाखल करून अहिंसेच्या आपल्या तात्विक भूमिकेला कृतीशील पातळीवरूनही लढा देत आहे.औषध कंपन्यांचे प्रचंड मोठे पैशांचे अमिश नाकारून मैत्रेयचा मूल्यांचा आग्रह अविचल राहतो.अचानक आजारी पडल्या नंतर मैत्रेयला 'लिव्हर सिरॉसिस' असल्याचे निदान डॉक्टरांकडून केले जाते.आणि अवयव पुनर्रोपणाचा पर्याय सुचवलं जातो. मात्र अहिंसेच्या तत्वाआड येणाऱ्या औषधांचे सेवन न करण्याच्या मैत्रेयच्या भूमिकेतून तो पुनर्रोपण आणि औषधे दोन्हीलाही नकार देतो.मरणपंथावर असताना शेवटी चार्वाक नावाचा मित्र त्याला ट्रान्सप्लांटसाठी तयार करतो. अतिशय बुद्धिमान आणि प्रचंड वैचारिक बैठक असणारा मैत्रेय आपल्या तात्विक भूमिकेचे तर्कशुद्ध समर्थन करतो.एखाद्या हठयोग्याला साजेसे त्याचे आचरण असल्यामुळे मैत्रेयची ही आदर्शवादी नैतिकता आवाहक वाटू लागते. परंतु ती एका अधिभौतिक पायावर उभी असल्याने लौकिक जगात-कायद्यात भावनातिरेकी दुराग्रह होऊन बसते.दिग्दर्शकाने चार्वाक या पात्राची योजना करून या दोन्ही मधील वैचारिक झगड्यात सतत बौद्धिक प्रतिप्रश्न रचत त्यातील सूक्ष्म पेच खूपच ताकदीने उभे केले आहेत.अहिंसेसारख्या मूल्याचे मानवेतर विश्वाशी असणारे विशाल प्रतल लक्षात घेता अहिंसा हे मूल्याचा एका वेगळ्याच व्यापक दृष्टीने प्रेक्षक विचार करू लागतो.मानवी जगण्यावर सतत होत जाणारे वास्तुविश्वाचे आक्रमण त्यात हरवणारी मूलभूत संवेदनांची स्पंदने आणि याच वस्तू विश्वाच्या अमर्याद हव्यासापुढे सतत हतबल होत राहणारी मानवी संवेदनेची हताशा यांचा प्रत्यय येत राहतो.


                स्टॉकब्रोकर नवीनच्या तिसऱ्या कथेतून भौतिक सुखाच्या प्राधान्य क्रमात जगण्याची लय हरवलेला एक 'प्रोटोगॉनिस्ट' शेवटी एका समृद्ध करणाऱ्या अर्थपूर्ण अपूर्णतेपाशी कसा येऊन पोहोचतो याचे अत्यंत मिस्कील तरल आणि काव्यात्मक चित्रण केले जाते.

            नवीन पैसे मिळवण्याच्या चक्रात एवढा मश्गुल आहे की त्याव्यतिरिक्त आयुष्यात बरंच काही मिळवण्यासारखं आहे याचा त्याला आता मागमूसही राहिलेला नाही .समाजवादी चळवळीतून खूप महत्वाचं काम केलेली आणि कुटुंब नियोजनासारख्या अत्यंत मौल्यवान करण्यासाटी आयुष्याची किंमत मोजलेल्या आजीशी साहजिकच त्याचे यावरून खटके उडतायत.वारंवार त्याला वाटते की परदेशी ब्रोकर आपले क्लायन्ट आहेत पण खरे तर तू त्यांचा गुलाम आहेस ही जाणीव आजी त्याला करून देते.ज्याला आपण मुक्तता समजतो आहोत ती खरी बद्धता आहे याची जाणीव येण्यासाठी आजी धडपडते.आपल्या आखीव जगातून बाहेर पडून आजीने सुचवलेले महत्वाचे पुस्तक वाचण्याचीही त्याला फुरसत नाही की आपल्या अतिशय जवळच्या गायकाचे साधे नावही त्याला ठाऊक नाही. स्वतःच्या 'किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन'वेळी नवीनला हॉस्पिटलमध्ये किडनी चोरीच्या घटनेचा सुगावा लागतो.प्रथम स्वतःची किडनी चोरीची आहे या कल्पनेने हादरून गेलेला नवीन या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे ठरवतो.शंकर नावाच्या एका मजुराने आपली किडनी पैशासाठी एका स्वीडिश नागरिकाला विकलेली असते.नवीनच्या प्रयत्नामुळे शंकरला नवीन किडनी मिळवून देण्याचे आश्वासन त्या व्यक्तीकडून मिळते खरे पण जगण्यामरण्याच्या लढाईत पिचलेल्या शंकरसाठी किडनीपेक्षा त्याला मिळणारे सहा लाख रुपये अधिक महत्वाचे ठरतात.या घटनेतील एका अथक झटापटीतून नवीनला एका अटळ वास्तवाला सामोरे जावे लागते.हळू हळू आजीच्या समृद्ध आयुष्याच्या आग्रहाचे मोल त्याला आकळत जाते.जीवनाची अर्थपूर्णता अनेकदा 'काहीतरी पूर्ण होण्यातच' असते असे नाही. अनेकदा हाती उरणारा रितेपणाही अनेक अर्थपूर्ण शक्यता निर्माण करणारा ठरतो.बऱ्याचवेळा अपूर्णता अर्थपूर्ण ठरते ती तिच्यासाठी आपण केलेल्या धडपडीमुळे. ही धडपड सार्थतेसाठी असली तरी मुक्कामाचा अट्टाहास तिच्यात नसतो.त्यासाटी केलेल्या समृद्ध प्रवासातच खरी सार्थकता आणि आनंद असतो.
         शंकरच्या किडनीसाठीचा अविरत शोध घेऊन हताशपणे परतलेला नवीन आजीला म्हणतो,
'बस इतनाही हो पाया."
त्यावर आजी शांतपणे समजावते,
" बस इतनाही  हो पाता है."
आणि पुढे ती खूपच अर्थपूर्ण बोलते,
" इतना हो पाया क्योंकी तुमने कुछ किया."

काहीतरी चांगलं करण्याची धडपडत आयुष्याला सुंदर बनवते: मग तिचा शेवट कितीही अपूर्ण राहो.

               या तीनही कथांमध्ये अवयव प्रत्यारोपण हा सामान धागा आहे जो पुन्हा मूळ थिसियसच्या मिथकापाशी घेऊन जाणारा आहे.अवयव प्रत्यारोपणामुळे यातल्या तिघांनाही एका नव्या आंतरिक प्रवासाला सामोरे जावे लागते आहे.बदलल्या गेलेल्या अवयवासह आपल्या अस्तित्वाच्या एका नव्या प्रवासातून स्वत्वाचा नवा अर्थ त्यांना कळत जातो.थिसियसच्या खरे जहाज कोणते मूळचे की जुने? या प्रश्नाप्रमाणेच अवयव बदललेले 'खरे आपण कोण'?असा स्वत्वशोधाकडे घेऊन जाणारा प्रश्न चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे.


                  या चित्रपटातले अनेक प्रसंग दिग्दर्शकाच्या चित्रपट माध्यमांवरील मजबूत पकड दर्शवणारे आहेत.चार्वाक आणि मैत्रेय यांचा फुटपाथवरून होणार सलग अडीच मिनिटांचा संवाद आणि त्याला शहराच्या भिंतीवरील ग्राफिटीची पार्श्वभूमी हा त्याचा एक उत्तम नमुना म्हणावा लागेल.चार्वाकाने सांगितलेली मुंग्या आणि बुरशीची गोष्टही मुळातून ऐकण्यासारखी आहे.पवनचक्क्यांच्या अजस्र पात्यांखाली, सांडपाण्याच्या दोन मोठ्या पाइपमधून चालत जाणारा मैत्रेय एका विशाल आधुनिक प्रतिकाचे दर्शन घडवणारा आहे.वस्तुविश्वाच्या प्रचंड गरगरत्या भवतालात हतबल ठरू लागलेला तरीही ठामपणे लढा देणारा माणसाचा एक सजग प्रतिनिधी त्यातून दिसत राहतो. आलियाच्या कथेत हिमालयातील एका नदीपुलावर पाय सोडून बसलेल्या आलियाच्या हातातून कॅमेराचे लेन्स कव्हर निसटते आणि वाहत्या प्रवाहात जाऊन पडते.हे दृश्य सिनेमाची दृश्यभाषेच्या प्रचंड ताकदीची खरी ओळख करून देणारे आहे.अंध आलियाला आता केवळ 'पाहत राहण्याला' सामोरे जावे लागणार आहे तिच्या नजरेवरील अंधत्वाची मर्यादा आता निघून पडली आहे.निवडीचे अनिर्बध स्वातंत्र्य हीच एक निराळी सजा होऊन बसते आहे याचे सूचन या प्रसंगातून ठळकपणे होते.


            वस्तूविश्वाला शरण जात चाललेल्या आजच्या समाजापुढे आपल्या अस्तित्वाचा स्वत्वाचा खरा अर्थ समजून घेण्याचे एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे.अशा वेळी 'शिप ऑफ थिसियस सारख्या कलाकृती मानवी अस्तित्वाचा एक निराळाच अर्थ आपल्या समोर उलगडत नेतात.हा अर्थ हाती घेऊन आपण चालू लागतो आणि ध्यानात येते की आपण वाढलोय.


-- श्रीराम मोहिते
(लेखक साहित्य,चित्रपट,आणि माध्यम अभ्यासक आहेत.)

Comments

Popular posts from this blog

अवडंबराच्या निचऱ्याचे प्रकरण