अवडंबराच्या निचऱ्याचे प्रकरण

 



अवडंबराच्या निचऱ्याचे प्रकरण वाचतोय. 

वाक्यावाक्यागणिक शहाणीवेच्या एका प्रगाढ अरण्यात शिरल्याची चाहूल लागलीय ;

पुढल्या थराराची अवचित ओळख पटल्यासारखी.

एकेक वाक्य म्हणजे जणू एकेक झाड.

भौतिकाच्या रसरशीत जीवनद्रव्यातून फुललेल्या सार्थ मौलिकतेसारखं.

हा प्रवास जितका गूढतरल असतो तितकाच रोमांचक...

या अरण्याशी जितकं सख्य वाढत जाईल तसा या चित्रलिपीचा उलगडा होतोय...

शब्दांच्या झुडपावेलींमधे,गचपणांमध्ये, फांद्यांच्या बेचक्यांमध्ये दबा धरून बसलेली अर्थाची पाखरं नजरेला गवसू लागतात हळूहळू.

लहानसहान साक्षात्काराच्या कवडशांनी अवचित आपलं असणं उजळून निघतं.

या अरण्याच्या स्वयंभू चित्रलिपीला भिडायचं तर कागदी निमंत्रण नाकारायला हवीत; ऐहिकाच्या सोहळ्यांनी अंगाला चिकटलेली पुटं खरवडायला हवीत हे पुरतं लक्षात येत जातं.

...तितक्यात समोरून वास्तवाचा विस्तव धरून काटेरान तुडवत येणारे डहाके सर दिसतायत...

जवळ येऊन खांद्यावर हलकेच थोपटत आपल्या त्या खोल खर्जातल्या आवाजात सांगू लागतात.

"झाड तोडायचं, कापायचं,लगदा करायचा 

कागद बनवायचा, मग त्यावर लिहायचं

ते छापायचं,

मग वाचायचं.

एवढा खटाटोप कशासाठी ?

सरळ झाडच वाचावं.

झाड वाचताना मला तुझाही अर्थ उलगडत जातो."


मी चमकून हातातल्या पुस्तकाकडे पाहतो...

पुस्तकाच्या कागदातून आणि त्यावरच्या शब्दांमधून मंद हसणारे हिमांशू सर दिसू लागतात,

तेच ते चिरपरिचित मंद स्मित.

वाऱ्याच्या हळुवार झुळुक यावी तसं.

प्रिय सर,

झाड वाचताना मला तुमचा आणि तुमच्या लिखाणाचाही अर्थ उलगडत जातो

...........................

उन्ह वाढतंच आहे माथ्यावरचं.सतत.

उपभोगाच्या, हव्यासाच्या आणि वखवखीच्या अजस्र वेगाने प्रचंड उग्र बनलेलं उन्ह.

सत्त्वाची सगळी ओल ओरबाडू पाहणारं.

घामाच्या धारांनी अख्खं शहर लदबदून गेलंय. जगण्याची आपली फरफट अपरिहार्य आहे आणि आपलं शहरात भिरभिरत राहणंदेखील.

उन्हाच्या झळांनी कातावलेले दुचाकीस्वार सिग्नलच्या लाल बाऊन्सर्सना शिताफीने चुकवत, रस्त्याकडेच्या सावलीच्या बॅकफूटवर विसावतायत,

इनिंग लांबवायची तर बचाव अभेद्य हवाच.

शहराच्या पर्यावरणात ऊर फुटेस्तोवर

धावत राहणारी आपली जीवनेच्छा भोगाच्या लालसेनं बरबटून गेलीय.

रोज नवं सुख भोगण्याची अजस्र झटापट.

वस्तूंचे जादुई मुखवटे चढवून बाजार

रात्रंदिवस स्वतःकडे हाकारतोय आपल्याला.

कितीही खाल्लं तरी तुम्ही उपाशीच उरताय.

भोगाचे नवनवे पर्याय शोधतच राहतो आपण.

अंतिमत: आपलं उपाशीपण तेवत ठेवतो.

नव्या उपाशीपणासाठीच जणू नव्या वस्तूंचा रवंथ. 

उपभोगाचे रस्ते अपरिहार्य असले; लालसेचं हे उन्ह अटळ असलं तरी या उन्हातच वाटेवरल्या सावल्यांच्या लिपीचं मोल अधिक सहज आकळू शकतं.

साऱ्या अवडंबराचं उन्ह असह्य होतं तेव्हाच ते गंधाचं मौन दरवळत येतं...

वाटेवरच्या सावलीसारखं, अवचित; आपल्या माथ्यावर.

लिख दे मेरी किस्मत में किसी पेडका साया

इक उम्र से तपते हुए सहरा में खड़ा हूँ 

प्रिय सर,

त्या सावलीतच उमगतं तुमचं आणि तुमच्या या लिखाणाचं; माथ्यावरच्या सावलीसारखं आमच्यासोबत असण्याचं मोल.

सर,

तुमचं लिखाण वाचताना दोन प्रतिमा सतत डोळ्यासमोर उभ्या ठाकतात.

पहिली एखाद्या शास्त्रीय गायकाची. पहिल्या षड्जावरच्या `आ'कारातच अख्ख्या मैफिलीला आपल्या अलवार स्वरांच्या मखमली पंखाखाली घेणाऱ्या. स्वरांची देखणी वास्तू उभारत तिच्यातून एका अनाम अनुभूतीकडं श्रोत्यांना अलवार नेऊ पाहणाऱ्या सिद्धहस्त गायकाची. 

दुसरी प्रतिमा टेस्ट प्लेअरची.

 दमदार बचाव आणि नज़ाकतदार फटक्यांचं अभेद्य तंत्रकवच धारण केलेल्या. तंत्राच्या अलवार धाग्यांनी टायमिंग आणि प्लेसिंगच्या भरजरी नक्षीकामातून इनिंगचं देखणं वस्त्र विणत जाणाऱ्या एखाद्या अभिजात क्रिकेटरची.

स्वरांच्या असल्या वास्तूदर्शनात किंवा फटक्यांच्या वस्त्रदर्शनात तुम्ही फारच हरवून गेलात तर

वर्गात लक्ष हरवलेल्या एखाद्या पोराच्या पाठीत हलकासा प्रेमळ धपाटा घालावा तसं हे लिखाण प्रसंगी हळूच कान टोचतं, चिमटे काढत राहतं.

पण त्या धपाट्यात शिक्षेची उग्रता नसते.

आपल्या बेफिकीर वाटचुकलेपणाला भानावर आणू पाहणारा जन्मजात कळवळा असतो. 

तपशीलांची गुंतवळीतून वाट काढत

पायी चालण्याचा आपला वसा निष्ठेनं जपत राहतं हे लिखाण...

उसन्या गतीचे सगळे मोह टाळत.

द्वैताच्या निबिडाला सामोरं जात,

अद्वैताच्या अथांगाला सतत धडका देत राहतं...

कबीर आठवतो.

"हद तपे सो औलिया

अनहद तप सो पीर

हद अनहद दोनों तपे ताको नाम फकीर."

जगण्यातल्या तपशीलांनी आखलेल्या हद्दी ओलांडतो त्याला अवलिया म्हणतात.

आणि अनहद म्हणजे असीमतेला स्पर्शू पाहणारा तो असतो पीर.

हद-अनहद या दोन्हीच्या पार मुक्तीचं अथांग अवकाश असतं.

तिथं पोहोचू शकणाराच फकीर बनतो.

अशा फकीरीसाठी ऐहिकातून पळ काढायची गरज नसते.

गरज असते ऐहिकाच्या पसाऱ्यातलं आपलं असणं सहजभावानं स्वीकारण्याची.

ऐहिक आणि आपण यांचं हे द्वैत चिकाटीनं पिंजत राहावं लागतं. या साऱ्या पसाऱ्याला साक्षीभावानं सामोरं जात त्यानं आपल्यावर चढवत नेलेल्या एकेका अवडंबरांचा निचरा करत राहावं लागतं. त्याशिवाय अद्वैताच्या अथांग अवकाशात दरवळणारं ते गंधाचं मौन हाती लागू शकणार नाही याचं स्वच्छ भान देणारं हे लिखाण ;

कबीर ज्या अनहद प्रदेशाबद्दल बोलतो त्याचीच जणू एक सुंदर वाट दाखवतं.


-श्रीराम सीताराम मोहिते

११ एप्रिल २०२२


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्वत्वाच्या शोधात 'थिसियसचे जहाज'