Posts

Showing posts from 2022

अवडंबराच्या निचऱ्याचे प्रकरण

Image
  अवडंबराच्या निचऱ्याचे प्रकरण वाचतोय.  वाक्यावाक्यागणिक शहाणीवेच्या एका प्रगाढ अरण्यात शिरल्याची चाहूल लागलीय ; पुढल्या थराराची अवचित ओळख पटल्यासारखी. एकेक वाक्य म्हणजे जणू एकेक झाड. भौतिकाच्या रसरशीत जीवनद्रव्यातून फुललेल्या सार्थ मौलिकतेसारखं. हा प्रवास जितका गूढतरल असतो तितकाच रोमांचक... या अरण्याशी जितकं सख्य वाढत जाईल तसा या चित्रलिपीचा उलगडा होतोय... शब्दांच्या झुडपावेलींमधे,गचपणांमध्ये, फांद्यांच्या बेचक्यांमध्ये दबा धरून बसलेली अर्थाची पाखरं नजरेला गवसू लागतात हळूहळू. लहानसहान साक्षात्काराच्या कवडशांनी अवचित आपलं असणं उजळून निघतं. या अरण्याच्या स्वयंभू चित्रलिपीला भिडायचं तर कागदी निमंत्रण नाकारायला हवीत; ऐहिकाच्या सोहळ्यांनी अंगाला चिकटलेली पुटं खरवडायला हवीत हे पुरतं लक्षात येत जातं. ...तितक्यात समोरून वास्तवाचा विस्तव धरून काटेरान तुडवत येणारे डहाके सर दिसतायत... जवळ येऊन खांद्यावर हलकेच थोपटत आपल्या त्या खोल खर्जातल्या आवाजात सांगू लागतात. "झाड तोडायचं, कापायचं,लगदा करायचा  कागद बनवायचा, मग त्यावर लिहायचं ते छापायचं, मग वाचायचं. एवढा खटाटोप कशासाठी ? सरळ झाडच वाचावं.