इरफान खान, निदा फाजली आणि अशाश्वतीचे सार्थपण
 -श्रीराम मोहिते


कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी झुंजणारा प्रसिद्ध अभिनेता इरफान खानने लिहिलेलं एक पत्र सध्या चर्चेत आहे. हाय-ग्रेड न्युरोएण्डोक्राइन नावाचा हा दुर्मिळ कॅन्सर प्रकार त्याच्या आयुष्यात एक वादळ घेऊन आला. मात्र जीवनमरणाच्या एका अतर्क्य शक्यतांशी होणारी झुंज त्याला आयुष्यातलं मोलाचं काहीतरी देऊन गेल्याचं विलक्षण अस्वस्थ करणारं पण हृद्य मनोगत त्यानं या पत्रात व्यक्त केलंय. आयुष्य नावाच्या एका वेगवान प्रवासात अचानक कुणीतरी सांगावं की आता तुमची उतरायची वेळ झालीय. तुमचं स्टेशन आलंय. अजून आपल्याला खूप स्टेशनं घ्यायचीयेत या भ्रमात आपण निर्धास्त वाहत जाताना अचानक कसलीही सूचना न मिळता आपलं अखेरचं स्टेशनं अचानक येऊन उभं ठाकण्याचा हा क्षण अतिशय हादरवून टाकणारा असतो. पण त्याचवेळी; हीच 'अशाश्वततेतली शाश्वती' आपल्या प्रवासाचा नवा अर्थ लावायला कशी मदत करते याच हळवं हृद्गत या पत्रातून व्यक्त होतं. मृत्यूच्या इतक्या निकटच्या दर्शनानं आपल्याला अंतर्बाह्य बदलून टाकल्याचं त्यानं लिहिलंय. या आजाराच्या निमित्ताने वेदनेचा, दुःखाचा, निरर्थकतेचा जो अनुभव त्याने घेतला तो त्याला एका क्षणी एखाद्या साक्षात्कारासारखा वाटला. आणि जणू ही वेदना,दुःख यांची जाणीवच एखाद्या यशासारखी चाखण्याची विलक्षण ताकद गवसल्याचे तो लिहितो. आपला भवताल आणि आपण यांच्यातील  एका अभेद्य नात्याचा अर्थ त्याला उलगडत जातो. इरफान खानचं हे पत्र म्हणजे एका संवेदनशील आणि प्रतिभावान अभिनेत्याचं जगण्याकडे पाहण्याचे विलक्षण भान व्यक्त करणारं आहे. मृत्यूच्या अकल्पित चाहुलीनं येणारी हतबलता, अगतिकता आणि त्याच्याशी सजगपणे झुंज घेताना अवचित हाती आलेलं जगण्याचं सार्थपण हे किती मोलाचं ठरतं हे या पत्रातून जाणवत राहतं.
             एखाद्या तरल गजल खूप काळ आत रुतून बसावी आणि एका क्षणी तिच्या अर्थाची एक निराळीच लड उलगडत जावी तशा आपण निग्रहाने जपलेल्या काही जखमा आपल्याला उन्नत करत राहतात हे यातनं जाणवलं.
सईद राही लिहितात-
अब न सूरज न सितारे न शमा न चाँद
अपने ज़ख्मों का उजाला है घनी रातों में
ही जखम एखाद्या गंधासारखी दरवळत राहते; आणि अवचित तिच्यातूनच एखादे बराच काळ अडलेले उत्तर सापडावे तसे भारावल्यासारखे होऊन जाते. अशा आपल्या असण्याचा ताबा घेऊ पाहणाऱ्या अनेक शक्यता आयुष्यात जागोजागी असतात. इरफानसारखं त्यांच्याकडे सजगपणे बघणं साधलं तर असं त्यांचं सार्थपण सापडू शकतं.
अगदी सहज म्हणून युट्युबवर एखादं नवं गाणं शोधावं पण एखादी जुनीच गजल नव्या अर्थाने हाती पडावी तसे हे जगण्याचे मौल्यवान क्षण अलगद हाती लागत जातात. रुटीनच्या पोलादी पकडीतून काही काळ का होईना सुटका होण्याची शक्यता तयार होत जाते. अजस्र कोलाहलात शांततेचा मंद दिवा तेवत राहावा तसा त्यातला अर्थ खोल उतरत जातो. आतले अंधारे कोनाडे जणू उजळत जातात.
आरती प्रभू म्हणतात तसा मग -
पाण्यांत ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा
एका बेसावध क्षणी आपल्या ओंजळीत साक्षात्कारासारखा एखादा रुपेरी मीन सापडतो.
जगजीत आणि चित्राचे विलक्षण संपृक्त स्वर
आणि निदा फाजलींचे जगण्याच्या गाभ्यातून आलेतसे वाटणारे शब्द जणू आपला जाणता हात खांद्यावर ठेऊन खूप मोलाचं काहीतरी सांगत राहतात.
दुनिया जिसे कहते हैं जादू का खिलौना है
मिल जाये तो मिट्टी है खो जाये तो सोना है
एकेक शब्द मनात उतरत जातो आणि खूप आतून काहीतरी हलल्यासारखं होतं. क्षणभर आपण आपला भवताल बाजूला टाकत स्वतःला कवीच्या शब्दांच्या स्वाधीन करतो. एरवी दुस्तर वाटणारं ते अध्यात्माचं वळण मग वेगळं सोपं रुपडं घेऊन साक्षात आपल्यालाच सामोरं येतं. श्रेयस आणि प्रेयस यांच्यातील द्वंद्व अलगद एकरुप होऊन जणू
सगुण साकार होत जातं. जगण्याला सामोरे जाताना अपरिहार्यपणे अस्वस्थ करणारं निरर्थकपण आणि अशाश्वती; त्यातून हाती लागू शकणारं जगण्याचं सार्थपण या ओळीतून व्यक्त होत राहतं. जग हे जणू एक जादुई खेळणं आहे. हाताला लागतं ते मातीसारखं. मातीमधल्या दोन शक्यता मग जाणवतात. 'माती होणे' म्हणजे एका अर्थाने संपून जाणे किंवा खरेतर या विराटात जणू विलीन होऊन जाणे. आणि दुसऱ्या बाजूने मातीत मिसळणे म्हणजे पुन्हा उगवून येण्याची एक नवी ऊर्मी जपत राहणे. जग आपल्या हाती लागत जातं ते या मातीसारखं- दोन निराळ्या शक्यता घेऊन. आणि हातून निसटत जातं ते सोन्यासारखं. काहीतरी मोलाचं आपण गमावतोय अशी एक हवीहवीशी हुरहूर मागे ठेवत. जीवन मात्र निर्ममपणे अव्याहत वाहत राहतं. माती की सोनं ही फिकीर ते नाही करत. ते फक्त वाहत राहण्याच्या आपल्या क्रमालाच काय ते बांधील असतं.
अच्छा-सा कोई मौसम तन्हा-सा कोई आलम
हर वक़्त का रोना तो बेकार का रोना है
चांगल्या वाईट क्षणांची सोबत मग तशी निरर्थकच ठरत जाते. जीवनक्रमात ती प्रत्येकाला असणारच आहे. सुखाचे ऋतू अंगावर घेताना जगण्यावरची श्रद्धा, प्रेम जीवनास्था फुलत राहते पण एकटेपणाचे जीवघेणे क्षण मात्र जगण्यावरचा विश्वास समूळ उखडून टाकणारे ठरतात. असं होणं म्हणजे जगण्याच्या त्या अस्सल अर्थाला मुकणं. कारण एव्हाना आनंद आणि दुःख या खरे तर एकाच नाण्याच्या दोन बाजू बनून गेलेल्या असायला हव्यात. त्यातली कुठलीही एक टाळणे म्हणजे जणू जगण्याशीच प्रतारणा. म्हणूनच सततचं रडत बसणं निरर्थक ठरावं. इरफान खान आपल्या पत्रातून तरी वेगळं काय सांगतोय ? दुःखात रडत बसण्याचा पर्याय नाकारून त्याला भिडणं; त्याला स्वीकारत जाणंच जगण्याला अर्थ देणारं असतं हेच तो सांगू पाहतोय.
बरसात का बादल तो दीवाना है क्या जाने
किस राह से बचना है किस छत को भिगोना है
एखाद्या आदिम पावसासारखा जीवन नावाचा हा कालप्रवाह त्याचं वाहत राहण्याचं वेडेपण कसं सोडेल? कारण हे वेडेपण हेच त्याचं खरं स्वरूप असतं. त्याला तुमचे आखीव व्यवहारी हिशोब अर्थातच न कळणारे. त्याचा कलंदरपणा म्हणजे जगाच्या दृष्टीने वेडेपणा. कुठल्या वाटांनी जाणं शिताफीनं टाळायचं आणि कुणाचं  छत अलगद भिजवायचं हे आडाखे त्याला नाहीतच कळणार. त्याला ठाऊक असते 'बरसत राहणे. हे एकदा समजत गेलं की काळाचा निर्ममपणा मग केवळ सुसह्यच होत नाही तर जागृतीचा नवाकोरा क्षण ठरतो.
ग़म हो कि ख़ुशी दोनों कुछ देर के साथी हैं
फिर रस्ता ही रस्ता है हँसना है न रोना है
मग जगण्याची खरी वाट सापडल्यासारखं होऊन जातं. दुःख आणि आनंद हे काही आपले कायमचे सोबती नसणार.( मग त्याची चिंता कशाला?) या दोन्हींच्या पार एक असा रस्ता येणार आहे की तिथे हसणं आणि रडणं दोन्हीही संपून जाईल.
हसण्या-रडण्याच्या पार जात जगण्याकडे पाहण्याची ताकद मिळवणं हेच जीवनाचं खरं श्रेयस बनतं. आणि तोच साक्षात्काराचा क्षण ठरतो. इरफान खानला जेव्हा हा क्षण भेटला तेंव्हा त्यानं त्याबद्दल लिहिलंय, "स्वातंत्र्य या शब्दाचा खरा अर्थ काय हे मला प्रथमच कळल्यासारखं वाटतंय. मला हे एखाद्या यशासारखं वाटू लागलं. जसा काही मी प्रथमच आयुष्याची लज्जत चाखतोय, त्याच्या जादूई बाजूचा अनुभव घेतोय. विश्वाच्या बुद्धिमत्तेबद्दल मला वाटणारा विश्वास दृढ झाला. माझ्या प्रत्येक पेशीत तो शिरलाय असं मला वाटू लागलं."
ये वक्त जो तेरा है, ये वक्त जो मेरा है
हर गाम पर पहरा है, फिर भी इसे खोना है
काळाची 'तुझी-माझी' अशी वाटणीसुद्धा मग संपत जाते. प्रत्येक पावलावर इथे जो कसलातरी पहारा होता. जपून चालण्याचा आग्रह होता ; नानाविध बंधने होती ते सगळेच पाश मग हळूहळू सुटत जातात. अशाश्वततेतली शाश्वती खऱ्या अर्थाने गवसत जाते. 'त्रिखंड हिंडून शोधितसे परी न गवसे असे ' हरपले श्रेय' त्यातल्या हव्याहव्याशा हुरहुरीसह सार्थ होत जाते.
           शेवटी कवी म्हणतो-
आवारा मिज़ाजी ने फैला दिया आंगन को
आकाश की चादर है धरती का बिछौना है
                      या सगळं काही निसटत हरवत जाण्याच्या अशाश्वतीवर एक उतारा असतो तो म्हणजे कवीचं कलंदरपण. त्याचं कवित्व. त्याची ती 'आवारा मिजाजी'. त्या कलंदरपणामुळेच तर त्याचा जगण्याचा अवघा पैस; जणू त्याचं अंगण विस्तारत गेलं. जगणं समृद्ध होण्याची त्याची वाट या वेडेपणातूनच तर खुली होत गेली. या बेभान जगण्यातूनच त्याला जगण्याचे भान हाती येत गेले. जगण्याचा आवाका एवढा विस्तारला की हे 'विश्वचि माझे घर' या ज्ञानदेवांच्या अनुभूतीप्रमाणे कवीसाठी आकाश ही चादर आणि धरती हा बिछाना बनला.
तिकडे इरफान म्हणतो तसं-
" जाणवतं की ओंडक्याने प्रवाहाचं नियंत्रण करण्याची काही गरजच नाही. जाणवतं की, निसर्गाच्या पाळण्यात तुम्हाला कोणीतरी हलकेच झुलवत असतं."
'आवारा मिजाजी'च्या, कलंदरपणाच्या प्रवासाअंतीच जणू एका विराट शक्तीशी असलेल्या आपल्या नात्याच्या अर्थाचा जुळणारा सांधा गवसत जातो.
            जगण्याची निरर्थकता एकदा आकळायला सुरुवात झाली की त्याच्या या सार्थतेचा खरा शोध सुरु होतो.

-श्रीराम मोहिते
 ९८२२४६०१७४
shrirammohite@gmail .com
(लेखक साहित्य आणि चित्रपट अभ्यासक आहेत.)

 पूर्वप्रकाशित-अक्षरनामा वेब पोर्टल
 http://www.aksharnama.com/client/article_detail/2210

Comments

Popular posts from this blog

अवडंबराच्या निचऱ्याचे प्रकरण

स्वत्वाच्या शोधात 'थिसियसचे जहाज'