काल के कपाल पे लिखता मिटाता हूँ...
-श्रीराम सीताराम मोहिते








 अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय राजकारणाच्या एका प्रदीर्घ कालपटावरचे लोकोत्तर लोकनायक होते.एरवीच्या राजकारणात दुर्मिळ अशी अभिजात शालीनता,मूळच्या प्रवाही आणि काव्यात्म भाषाशैलीला धारदार वाचन-व्यासंगाची जोड देऊन घडवलेलं अमोघ वक्तृत्व,राजकारणाच्या वादळी धुमश्चक्रीतसुद्धा आपल्या व्यक्तित्वात अलवारपणे जपलेलं विलक्षण तरल कवित्व, आणि अंतर्बाह्य आचरणाला दिलेलं अपूर्व नैतिक अधिष्ठान यामुळे अटलजी देशाच्या राजकीय-सामाजिक इतिहासातले एक अव्दितीय व्यक्तिमत्व ठरते. लाघवीपण आणि कणखरपणा यांची एक विलक्षण बेमालूम गुंफण हा त्यांच्या व्यक्तित्वाचा एक ठळक विशेष होता. एका बाजूला गोध्रा हत्याकांडानंतर गुजरात सरकारला सडेतोडपणे राजधर्माची आठवण करून देणारे, कारगील युद्धाची मोहीम आपल्या विजिगीषू वृत्तीने विजयाप्रत नेणारे, आणि पोखरण अणूचाचणीमधून आपल्यातल्या धाडसी नेतृत्वाचे गुण दाखवणारे अटलजी आणि दुसऱ्या बाजूला लहान मुलांशी निरागस बांध जपणारे, विरोधी पक्षातल्या लोकांवरही अकृत्रिम असे प्रेम करणारे, आणि या सगळ्यात आपल्या आतल्या तरल कवित्वाची तेजस्वी ज्योत मालवू न देणारे कवी अटलजी अशा दोन्ही व्यक्तित्वस्तरांवर ते ज्या निर्व्याज सहजतेने वावरले ते खरेच अविश्वसनीय आहे. इतके अविश्वसनीय की इतक्या तरल प्रतिभेचा एक सुसंस्कृत माणूस या देशाचा पंतप्रधान होता यावर विश्वास ठेवणे यापुढे कठीण व्हावे. वक्तृत्व आणि कवित्व या दोन्ही स्तरावर अटलजी एका अलौकिक प्रतिभेचे धनी होते. त्यांच्या वक्तृत्व आणि कवित्वातही संवेदनशीलता आणि परखडपणा यांचा सुरेख मिलाफ दिसतो. पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर तेरा दिवसांच्या कार्यकाळात तसेच पु. ल. देशपांडे यांच्या उपस्थितीत पुण्यात सावरकरांवर केलेली अशी घणाघाती आणि अभ्यासपूर्ण भाषणे आणि 'मेरी इक्यावन कविताएँ' सारख्या कवितासंग्रहामधून येणाऱ्या अर्थगर्भ चिंतनशील कविता हे अटलजींमधले एक विलक्षण लोभसवाणे प्रातिभासिक अद्वैत आहे.


  
                          आपल्या खेळकर दृष्टीने एखाद्या विसंगतीवर हलकेच मिश्किल बोट ठेवणारे अटलजी आपल्या भाषणांमधल्या अर्थपूर्ण 'पॉझेससाठी' प्रसिद्ध होते. आपल्या संथ पण प्रवाही लयीतल्या भाषणांमध्ये क्षणभर डोळे मिटून 'पॉझ' घेणारे अटलजी आजही डोळ्यासमोर उभे राहतात. त्यांच्या भाषणांमधले हे विराम बऱ्याचदा अतिशय बोलके असायचे. त्या विरामानंतरच्या एका अर्थपूर्ण भाष्याकडे अलगद घेऊन जाणाऱ्या हिंदोळ्याच्या लयीसारखे. जीवनाच्या या मंचावरून अटलजींनी आता अंतिम विराम घेतला आहे. या अखंड संवादयात्रेच्या अंती अटलजींनी घेतलेल्या या प्रदीर्घ 'पॉझ'नंतर त्यांना काय बोलायचे असेल? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी आधीच आपल्या हाती देऊन ठेवले आहे. आत्मशोधाची अनावर इच्छाशक्ती बाळगणाऱ्या आपल्या कवितेच्या रूपाने.

                 

 
 
                           अटलजींची कविता हे व्यष्टी आणि समष्टीच्या सर्वंकष उन्नयनासाठी आळवलेले एक चिंतनशील स्वगत म्हणता येईल. प्रखर देशनिष्ठा, चिरंतन मानवी मूल्यांवरचा अढळ विश्वास, भवतालातील दहशतीविषयीची भयव्याकुळता, या भयव्याकुळतेवर मात करण्याचा दुर्दम्य आशावाद आणि जन्ममृत्यू विषयीच्या अपार कुतुहलातून प्रकटणारी प्रगल्भ चिंतनशीलता ही अटलजींच्या कवितेतील काही प्रमुख आशयसूत्रे सांगता येतील. संस्कृतप्रचुर भाषाशैलीचा अनवट वापर, काव्याच्या आंतरिक लयीचे भान, समकालीन पेचप्रसंगांना दिलेली ऐतिहासिक-पौराणिक संदर्भांची जोड, प्रखर राष्ट्रनिष्ठेसह येणारा मानवी मूल्यांचा आग्रह, आणि आत्मोन्नतीची प्रगाढ तळमळ या वैशिष्ट्यांमुळे अटलजींच्या कवितेतून एक अस्सल काव्यात्मक भान व्यक्त होताना दिसते. मेरी इक्यावन कविताएँ’ हा त्यांचा संग्रह १३ ऑक्टोबर १९९५ रोजी नवी दिल्लीत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या हस्ते प्रकाशित झाला. त्यानंतरच्या काळात श्रेष्ठ गझलगायक जगजितसिंग यांचा स्वरसाज लाभलेला 'संवेदना' या अल्बममधून अटलजींनी कविता सर्वदूर पोहोचली. अटलजींच्या काव्यातील तरल चिंतनशीलता जगजीतजींच्या आवाजात अधिकच गहिरा परिणाम करून जाते. 'क्या खोया क्या पाया' या कवितेतून व्यक्त होणारी कवीची आंतरिक हुरहूर दीर्घकाळ मनात रेंगाळत राहील अशी आहे. अटलजींचे आजोबा आणि वडील हे दोघेही उच्च दर्जाचे साहित्यिक व कवी होते त्यामुळे ‘कविता मुझे घुट्टीमें मिली थी' म्हणजेच ‘कविता आपल्याला वारसा हक्‍काने मिळालेली आहे,’ असे अभिमानाने सांगणारे अटलजी या कविकुळाचे हळवे सांगाती होते. ‘आपण राजकारणात शिरलो नसतो तर कवी-साहित्यिक झालो असतो,’ असेही आपल्या एका मनोगतातून सांगितले आहे.

               

 
                            अटलजींच्या कवितेतून एक प्रकारची ठोस विधानात्मकता, आणि जीवनाविषयीचे भाष्य प्रकट होताना दिसते. आणि या संपृक्त अर्थवत्तेमुळेच त्यामुळेच त्यांची अनेक वाक्ये सुभाषितांचा स्तरावर पोहोचतात. 'छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता।' या जगण्याचा पेच अचूक पकडणाऱ्या ओळी असतील किंवा 'मेरे प्रभु ! मुझे इतनी ऊँचाई कभी मत देना, ग़ैरों को गले न लगा सकूँ, इतनी रुखाई कभी मत देना।' या प्रार्थनेच्या उत्कटतेपर्यंत पोहचू शकणाऱ्या पंक्ती असतील किंवा मग 'केवल ऊँचाई ही काफ़ी नहीं होती, ऊँचाई और गहराई में आकाश-पाताल की दूरी है।' असं जगण्याचं खोल भान देणाऱ्या ओळी असतील, जगण्यातले छोटे छोटे क्षण आणि त्यातून हाती गवसणारे सत्याचे लहानसहान अंश अटलजी सहजपणे कवितेत पकडतात. कारण त्यांच्या एकूणच काव्यगत व्यक्तित्व हे 'ओस भी तो एक सच्चाई है, यह बात अलग है कि ओस क्षणिक है क्यों न मैं क्षण क्षण को जिऊँ? कण-कण मेँ बिखरे सौन्दर्य को पिऊँ?' अशा सौन्दर्यासक्त जीवनदृष्टीवर पोसलेले जाणवते. म्हणूनच जगण्यातल्या अगणित संकटांमधून उभारी घेऊ पाहणारा आशावाद ते आपल्या कवितेतून सतत जपत राहतात. 'विपदाएँ आती हैं आएँ, हम न रुकेंगे, हम न रुकेंगे। आघातों की क्या चिंता है ? हम न झुकेंगे, हम न झुकेंगे।' अशी विपत्तीतून धैर्याने वाट काढू पाहणारी लढाऊ वृत्ती त्यांच्या कवितेत सतत प्रकट होते आणि म्हणूनच दुःखाने काळवंडून गेलेल्या मनांमध्ये नवचेतना फुंकण्याचे सामर्थ्य त्यांची कविता बाळगून आहे. 'आने वाला कल न भुलाएँ। आओ फिर से दिया जलाएँ।' असा सतत प्रज्वलित आशावाद ते आपल्या कवितेतून जागवत राहतात.

                 

                                                                                                            

त्यांची कविता जगण्याकडे प्रगल्भपणे पाहते आणि त्यातल्या अंतःस्तरावरील अनेक पेचांना सहजपणे स्पर्श करत जाते. अगदी प्रत्येक वाढदिवसाला ते एक कविता लिहायचे. जणू एका काव्यात्म साक्षित्वाने आपल्याच जीवनप्रवासाकडेच वळून पाहण्याचा हा प्रयत्न होता. त्यांच्या अशा कवितांमधून मृत्यूविषयीची चिंतनशील समज व्यक्त होते. कधी ती 'कितने पत्थर शेष न कोई जानता? अशा हताशेतून जाणवते तर कधी आपल्या व्यक्तित्वातला 'हर पच्चीस दिसम्बर को, जीने की एक नई सीढ़ी चढ़ता हूँ, नए मोड़ पर, औरों से कम, स्वयं से ज्यादा लड़ता हूँ।' असा अंतर्बाह्य झगडा व्यक्त करते. 'यक्षप्रश्न' या त्यांच्या कवितेत ते लिहितात, 'जो कल थे, वे आज नहीं हैं। जो आज हैं, वे कल नहीं होंगे। होने, न होने का क्रम, इसी तरह चलता रहेगा, हम हैं, हम रहेंगे, यह भ्रम भी सदा पलता रहेगा।' जगण्यातल्या अशाश्वततेचे इतके तटस्थ भान व्यक्त करणारी कविता अटलजी लिहू शकले ते 'असणे,जगणे आणि व्यक्त होणे' यातल्या विलक्षण अतूट अशा भानामुळेच. म्हणूनच जगण्याचे खरे साफल्य कशात आहे ते त्यांना अगदी अचूकपणे आकळले होते. 

‘अंतिम यात्रा के, अवसर पर,
विदा की वेला में’
जब सब का साथ छूटने लगता है,
शरीर भी साथ नही देता,
आत्मग्लानी से मुक्‍त,
यदि कोई हाथ उठाकर यह कह सकता है,
कि उसने जीवन में जो कुछ किया,
ही समझकर किया,
किसी को जान बूझकर चोट पहूँचाने के लिये नही,
सहज कर्म समझकर किया,
तो उसका अस्तित्व सार्थक है,उसका जीवन सफल है।’


अशा आध्यात्मिक स्तरावर पोहोचणारी काव्यात्मदृष्टी या प्रगल्भ भानामुळेच त्यांना प्राप्त झाली होती. 'इतना काफ़ी है अंतिम दस्तक पर, खुद दरवाज़ा खोलें!' अशा प्रगाढ आत्मभानाकडे जाणारी ही कविता जीवनाच्या 'श्रेयस-प्रेयसाचा' अभिन्न प्रवास रेखाटते. 

               जगभरातल्या नानाविध दहशतीची रूपे, आणि त्याविषयीची अपार चिंता अटलजींच्या कवितेतून बऱ्याचदा व्यक्त झालेली दिसते.

'इस जीवन से मृत्यु भली है,

आतंकित जब गली गली है,

मैं भी रोता आसपास जब,

सड़कों पर इतनी धूल उड़ती है,

कि मुझे कुछ दिखाई नहीं देता।

मैं सोचने लगता हूँ।'



या दहशतीची भयव्याकूळता व्यक्त करणारी त्यांची 'हिरोशिमा की पीड़ा' ही एक लक्षणीय कविता आहे. हिरोशिमा नागासाकीचा नरसंहार त्यांच्यातील कवीला प्रश्नमग्न बनवतो.

'मैं सोचने लगता हूँ कि,

जिन वैज्ञानिकों ने अणु अस्त्रों का आविष्कार किया था,

वे हिरोशिमा-नागासाकी के भीषण नरसंहार के समाचार सुनकर, रात को कैसे सोए होंगे?'


                  त्यांची कविता पौराणिक ऐतिहासिक संदर्भानी युक्त आहे. महाभारत, रामायण, पुराणकथा यांचे संदर्भ ते फारच अर्थपूर्ण रीतीने कवितेतून गुंफतात. त्यांच्या कवितेतली अस्सल भारतीयत्वाची जाणीव या संदर्भातून उजागर होत जातात. कधी त्यांची कविता 'कौरव कौन कौन पांडव, टेढ़ा सवाल है। दोनों ओर शकुनिका फैला कूटजाल है। असा समकाळाच्या अभेद्य कूटप्रश्नाकडे आपले लक्ष वेधते. तर कधी
नचिकेताच्या प्रश्नोपनिषदाचा संदर्भ समकालीन परिप्रेक्षात शोधते.
प्रत्येक नया नचिकेता,
इस प्रश्न की खोज में लगा है।
सभी साधकों को इस प्रश्न ने ठगा है।
शायद यह प्रश्न, प्रश्न ही रहेगा।
यदि कुछ प्रश्न अनुत्तरित रहें

                     या कवितेतून एकटेपणाची हुरहूर अनेकदा तीव्रतेने व्यक्त होते. ‘जब वह एकांत में बैठकर विचार करता है, वह एकांत, फिर घर का कोना हो, या कोलाहल से भरा बाजार !’ यासारख्या ओळींमधून भवतालच्या कोलाहलातही एकांत जपण्याची कला त्यांना अवगत होती हे लक्षात येते. म्हणूनच ते ‘पृथिवी पर, मनुष्य ही ऐसा एक प्राणी है, जो भीड में अकेला और अकेले में भीड से घिरा अनुभव करता है ।’ अशा सूचक निरीक्षणशक्तीतून या एकांताच्या अनेक मितींचा वेध घे
ते.
                            मानवतावादाच्या व्यापक पायावर उभा असणारी प्रगल्भ राष्ट्रवादी जाणीव, जगण्याच्या सूक्ष्म अंतःस्तराचा वेध घेण्याची काव्यात्म शक्ती आणि सतत नव्या स्वप्नांकडे झेपावणारा , इतरांना त्यासाठी प्रेरणा देणारा अक्षय आशावाद यामुळे अटलजींची कविता आपला अमीट ठसा उमटवणारी आहे. ती सतत जगण्यातल्या निखळतेकडे आपल्याला खेचत राहते. आपल्या छोट्या मोठ्या व्यथांनी ठेचाळणाऱ्या मनाला अभिव्यक्तीची चेतना पुरवते.
'टूटे हुए सपनों की कौन सुने सिसकी
अन्तर की चीर व्यथा पलकों पर ठिठकी
हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा,
काल के कपाल पे लिखता मिटाता हूँ
गीत नया गाता हूँ'

           अटलजींची कविता सतत व्यथेच्या दारुण अगतिकतेवर मात करण्याचे स्वप्न दाखवते आणि काळाच्या कपाळावर आपली एक ठसठशीत आणि अमीट अशी नाममुद्रा उमटवते.


-श्रीराम सीताराम मोहिते

Comments

Popular posts from this blog

अवडंबराच्या निचऱ्याचे प्रकरण

स्वत्वाच्या शोधात 'थिसियसचे जहाज'