काल के कपाल पे लिखता मिटाता हूँ... -श्रीराम सीताराम मोहिते अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय राजकारणाच्या एका प्रदीर्घ कालपटावरचे लोकोत्तर लोकनायक होते.एरवीच्या राजकारणात दुर्मिळ अशी अभिजात शालीनता,मूळच्या प्रवाही आणि काव्यात्म भाषाशैलीला धारदार वाचन-व्यासंगाची जोड देऊन घडवलेलं अमोघ वक्तृत्व,राजकारणाच्या वादळी धुमश्चक्रीतसुद्धा आपल्या व्यक्तित्वात अलवारपणे जपलेलं विलक्षण तरल कवित्व, आणि अंतर्बाह्य आचरणाला दिलेलं अपूर्व नैतिक अधिष्ठान यामुळे अटलजी देशाच्या राजकीय-सामाजिक इतिहासातले एक अव्दितीय व्यक्तिमत्व ठरते. लाघवीपण आणि कणखरपणा यांची एक विलक्षण बेमालूम गुंफण हा त्यांच्या व्यक्तित्वाचा एक ठळक विशेष होता. एका बाजूला गोध्रा हत्याकांडानंतर गुजरात सरकारला सडेतोडपणे राजधर्माची आठवण करून देणारे, कारगील युद्धाची मोहीम आपल्या विजिगीषू वृत्तीने विजयाप्रत नेणारे, आणि पोखरण अणूचाचणीमधून आपल्यातल्या धाडसी नेतृत्वाचे गुण दाखवणारे अटलजी आणि दुसऱ्या बाजूला लहान मुलांशी निरागस बांध जपणारे, विरोधी पक्षातल्या लोकांवरही अकृत्रिम असे प्रेम करणारे, आणि या सगळ्यात आपल्या आतल्या तरल कवित्वा...